सातारा : भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा संयोजक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुनीलतात्या काटकर यांना सातारा-सांगली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी, खा. उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उमेदवारीची मागणी करणार असल्याचेही सांगण्यात आले.
सुनीलतात्या काटकर हे गेल्या अनेक वर्षांपासून खा. उदयनराजे भोसले यांच्यासमवेत त्यांचे खंदे समर्थक म्हणून कार्यरत आहेत. खा. उदयनराजे भोसले यांचा जिल्ह्यासह राज्यभरातील जनसंपर्क ते यशस्वीपणे सांभाळत असून त्यांनी उत्कृष्ट संघटन केलेले आहे. खा. उदयनराजेंसमवेत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण सभापतीपदाची संधी लाभली. या कालावधीत त्यांनी अनेक दिशादर्शक निर्णय घेत शैक्षणिक विकासात योगदान दिलेले आहे तसेच जिल्ह्यात अनेक मोठी विकासकामे मार्गी लावलेली आहेत.
खा. उदयनराजे भोसले यांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली असून खा. उदयनराजे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे संघटन त्यांनी कौशल्यपूर्णपणे बांधून ठेवलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे लोकसभा संयोजक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करताना त्यांनी पक्षाने टाकलेल्या जबाबदार्या समर्थपणे पेलल्या आहेत. आज देखील ते 24 तास राजकीय व सामाजिक क्षेत्रात एका जबाबदारीने कार्यरत आहेत.
सुनील काटकर यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यास सातारा - सांगली मतदारसंघातील प्रश्न सुटण्यास चांगली मदत होईल. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क असून लोकप्रतिनिधींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करुन भारतीय जनता पार्टीने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अॅड. दत्ता बनकर, बाळासाहेब गोसावी, मनोज शेंडे, काका धुमाळ, संग्राम बर्गे, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, नासीर शेख, नियोजन समिती सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मनिषा घोरपडे, नगरसेवक व पक्ष प्रतोद निशांत पाटील, अण्णा लेवे, किशोर शिंदे, संजय शिंदे, बाळासाहेब ढेकणे, पंकज चव्हाण, इर्शाद बागवान, सुजाता राजेमहाडिक, रंजना रावत, बाळासाहेब खरात, लक्ष्मण कडव, समृध्दी जाधव, सागर पावशे, सुधाकर यादव, बाळासाहेब राक्षे या खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी केली आहे.