सातारा : सातारा शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वाहनांच्या काचांवर लावण्यात येणारे काळे पडदे, नियमबाह्य नंबर प्लेट आणि मोठा आवाज करणारे मॉडीफाय सायलेन्सर यांच्यावर वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून शहरातील प्रमुख मार्गांवर दररोज तपासणी सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक शाखेने स्वतंत्र पथके तयार केली आहेत. पवई नाका, जिल्हा परिषद चौक, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरासह मुख्य वाहतूक मार्गांवर सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांची तपासणी केली जात आहे. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना थांबवून जागेवरच दंड आकारला जात असून काही वाहनांवरील ब्लॅक फिल्म काढून टाकण्यात येत आहे.
वाहतूक विभागाकडून विशेषतः हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नसलेल्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच फॅन्सी अक्षरे, वेगळ्या डिझाइनच्या नंबर प्लेट आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दुचाकी चालकांवरही कारवाई केली जात आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाहतूक विभागाने मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
“वाहनांमध्ये केले जाणारे बेकायदेशीर बदल रोखणे आणि वाहतूक शिस्त निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील,” असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्पष्ट केले.