सातारा : सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकातून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, महारुद्र तिकुंडे, भरत रावळ, जानकर, निलेश धनवडे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
सभा सुरू असताना नागरिकांना बोलता येत नसले तरी “फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील” अशी भाषा वापरणे अयोग्य असून ही हुकूमशाहीची भूमिका असल्याचे आंदोलकांनी म्हटले. मुख्याधिकारी हे सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनू नयेत, तसेच संबंधित पत्रक मागे घेऊन सातारकर नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज, २० मे रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी मुख्याधिकारी विनोद जळक यांनी संबंधित आक्षेपार्ह ओळ काढण्याबाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांसमोर विषय मांडून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश यांनी युवक, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांविषयी केलेल्या कथित वक्तव्याचाही सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध केला. न्यायव्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा असताना अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशाची मान शरमेने खाली गेल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.