मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या विविध प्रश्नांचे निवेदन; खा.उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली सुनील काटकर यांच्या शिष्टमंडळाची वर्षा निवासस्थानी भेट

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महायुती समन्वयक सुनील काटकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध विकासकामे, ऐतिहासिक वारसा संवर्धन, शिक्षण, युवकांच्या रोजगारासह अनेक विषयांवर निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी किल्ले प्रतापगड प्राधिकरण समिती सदस्य काका धुमाळ, नंदकुमार माने, लक्ष्मण कडव, चिन्मय कुलकर्णी, जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती सदस्य अॅड. विनित विलास पाटील, अविनाश माने आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळाने एनसीईआरटी अभ्यासक्रमातून अन्यायकारक पद्धतीने नकाशा वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना तीव्र असल्याचे सांगितले. राज्य शासनाने याबाबत केंद्र शासनाकडे निषेध नोंदवून संबंधित नकाशा सन्मानपूर्वक पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जिहे-कटापूर सिंचन योजनेचा नाबार्ड योजनेत समावेश करण्याची मागणीही करण्यात आली. या योजनेमुळे सातारा जिल्ह्यातील शेती आणि पाणीप्रश्नाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेवरील स्थगितीचा मुद्दाही बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील अनेक युवक-युवतींच्या आयुष्याला दिशा मिळण्याची अपेक्षा होती. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नियुक्त्या रखडल्याने हजारो उमेदवार मानसिक तणावाखाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी भरतीवरील स्थगिती तातडीने उठवून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. सिडको हद्दीत असलेल्या या किल्ल्याभोवती वाढत्या अतिक्रमणांमुळे आणि अपुऱ्या दुरुस्तीमुळे किल्ल्याची अवस्था बिकट होत असल्याचे सांगण्यात आले. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून तज्ज्ञ पद्धतीने किल्ल्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि त्यासाठी सिडकोकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करण्यात आली.

केंद्र शासनाच्या विविध अभिलेखांमध्ये सातारा जिल्ह्याचा उल्लेख “सतारा” असा होत असल्याने ऐतिहासिक नावाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. सर्व अधिकृत अभिलेखांमध्ये “सातारा” असा योग्य उल्लेख करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

याशिवाय छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली. सैनिक स्कूल सातारा संदर्भातील विविध समस्यांवरही चर्चा झाली. यामध्ये शाळेजवळील रस्त्याचे रुंदीकरण, बांधकामासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरी आणि विद्यार्थ्यांच्या शुल्कात महाराष्ट्र शासनामार्फत सवलत देण्याची मागणी करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लाचलुचपतचा स्फोट; सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात, ३० हजारांची लाच स्वीकारताना कारवाईने खळबळ
पुढील बातमी
मुख्याधिकाऱ्यांविरोधात साताऱ्यात आत्मक्लेश आंदोलन; लोकशाहीचा गळा घोटल्याचा सुशांत मोरे यांचा आरोप

संबंधित बातम्या