सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लाचलुचपतचा स्फोट; सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात, ३० हजारांची लाच स्वीकारताना कारवाईने खळबळ

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास गजानन जोशी यांना रंगेहाथ पकडले. मेडिकल बिलाच्या कामासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे मेडिकल बिल मंजूर करून त्यातील फरकाची रक्कम काढून देण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. अनेक दिवसांपासून काम प्रलंबित ठेवत लाचेची मागणी होत असल्याने वैतागलेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीचे अधीक्षक श्री. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मेडिकल बिलांच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

सातारा जिल्हा रुग्णालयातील मेडिकल बिलांच्या प्रक्रियेबाबत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत. विशेषतः पोलिस कर्मचारी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांची मेडिकल बिलं मंजुरीसाठी महिनोनमहिने प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. फाईल पुढे सरकवण्यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती. अनेकदा संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास फोनही उचलला जात नसल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या ताज्या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयातील बिल मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एसीबीच्या कारवाईनंतर इतर व्यवहारांचीही चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासन, डीन डॉ. विनायक काळे तसेच संबंधित विभागाकडून या प्रकरणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतमजूरीच्या कारणातून एकाचा खून ; दोन महिलांसह आठ जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या विविध प्रश्नांचे निवेदन; खा.उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली सुनील काटकर यांच्या शिष्टमंडळाची वर्षा निवासस्थानी भेट

संबंधित बातम्या