कोकरूड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत दडलेली निसर्गाची गुपिते आणि जैवविविधतेचे अनोखे वैभव पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकल्पाच्या घनदाट व सुरक्षित जंगलात वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या लेपर्ड कॅट म्हणजेच रानमांजराच्या एका वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचे दर्शन घडले आहे. मार्जर कुळातील हा प्राणी अतिशय लाजाळू असल्याने त्याचे दर्शन मिळणे हे वन्यजीव क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा तब्बल 1,165.57 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला असून, येथे विविध संकटग्रस्त आणि दुर्मीळ सस्तन प्राण्यांचा वावर आहे. बिबट्यासारखे ठिपके आणि मांजरासारखे रूप असलेली ही लेपर्ड कॅट सह्याद्रीतील कोअर झोनच्या सुरक्षित अधिवासाची साक्ष देत आहे. दाट जंगलात रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्या या प्राण्याला जंगलाचे उत्तम आरोग्य दर्शवणारा सूचक मानले जाते. त्यामुळे वन्यजीवप्रेमींच्यादृष्टीने हा वाघ-बिबट्यापेक्षाही दुर्मीळ शोध मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पातून पहिल्यांदाच ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) कॅमेऱ्यात कैद झाल्याची ऐतिहासिक नोंद झाली होती. त्यानंतर आता या दुर्मीळ लेपर्ड कॅटच्या अस्तित्वामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.