सातारा : लिंब, ता. सातारा येथे जेसीबी नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलंकार दत्तात्रय मडके (वय ४५, रा. लिंब, ता. जि. सातारा) यांच्या राहत्या घरासमोर दि. १८ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.संशयित आरोपी अक्षय कृष्णात बरकडे, मंदाकिनी कृष्णात बरकडे व सोनाली संभाजी गुदे (सर्व रा. लिंब, ता. जि. सातारा) हे जेसीबी फिर्यादी यांच्या जागेतून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी “आमच्या जागेतून जेसीबी घेऊन जाऊ नका, तुमच्या जागेतून घ्या,” असे सांगितल्याने वाद झाला.
वाद वाढताच अक्षय याने फिर्यादींचे भाऊ अमित मडके यांच्या पाठीवर दगडाने मारहाण केली तसेच हातातील धारदार वस्तूने फिर्यादींच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. यावेळी मंदीकिनी बरकडे आणि सोनाली गुदे यांनी फिर्यादींची पत्नी सोनाली व मुलगा अर्थव यांना धक्काबुक्की करत मारहाण व शिवीगाळ करत दमदाटी केली.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.