वाई : पसरणी (ता. वाई) येथील अस्मिता योगेश शिर्के या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह शेंदूरजणे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अस्मिता ही सातारा येथील यशोदा टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान, तिची दुचाकी (एमएच ११ बीजी ३८८) वाई शहरालगत मोतीबाग परिसरात कालव्याजवळ पार्क केलेल्या अवस्थेत आढळून आली.
दुचाकी आढळून आल्यानंतर तिचा शोध घेतला असता दोन-तीन किलोमीटर अंतरावरील कालव्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात कालव्यात पडून मृत्यू झाला की, अन्य काही कारण आहे.
याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अस्मिताचे वडील योगेश शिर्के हे दुबई येथे नोकरीनिमित्त कार्यरत असल्याचे समजते.