नीट पेपरफुटी : शिवराज मोटेगावकर यांना नऊ दिवसाची सीबीआय कोठडी; टोळीशी संगनमत करून पेपर फुटी आणि प्रसार केल्याचे प्राथमिक तपासात समोर

by Team Satara Today | published on : 18 May 2026


पुणे / लातूर : नीट- युजी २०२६ पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील प्रसिद्ध रेनुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संस्थापक आणि संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर त्यांना सीबीआय चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुणे न्यायालयाने मोटेगावकर याची ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या १० दिवस आधीचा लीक्ड प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा केला आहे. त्यांना या प्रकरणातील सक्रिय सदस्य म्हणून ओळखले जात आहे. आरसीसीने घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये नीट मुख्य परीक्षेतील ४२ केमिस्ट्री प्रश्न जसेच्या तसे आल्याने आधीच संशय व्यक्त करण्यात आला होता. सीबीआयच्या तपासात मोटेगावकर यांचा राष्ट्रीय चाचणी संस्थेशी (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) संबंधित इतर आरोपींशी (जसे पी.व्ही. कुलकर्णी) कनेक्शन समोर येत आहे.

मोटेगावकर यांनी संघटित टोळीशी संगनमत करून पेपर फुटी आणि प्रसार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या पुणे आणि लातूर कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. आरसीसीच्या विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे. यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असा दावा सीबीआयने केला आहे.

मोटेगावकर हे महाराष्ट्रातील नीट तयारीसाठी अत्यंत लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांच्या आरसीसी संस्थेच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. या अटकेने कोचिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेपर लीकमुळे होणारे मानसिक आणि शैक्षणिक नुकसान भरून निघणार नाही, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ९ दिवसांच्या कोठडीत मोटेगावकर यांच्याकडून इतर सहभागी, नेटवर्क आणि पेपर फुटीचा स्रोत याबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रकरणात आणखी अटका होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

'पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर यांची रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. सदर प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार आरोपी पी. व्ही. कुलकर्णी हा परीक्षाप्रक्रियेशी संबंधित होता. प्रा. मोटेगावकर याचे लातूरमधील कार्यालय, तसेच निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. तेव्हा रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नसंच सापडले. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न ३ मे रोजी पार पडलेल्या 'नीट'च्या प्रश्नपत्रिकेत होते. पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
औषध विक्रेत्यांचा बुधवारी देशव्यापी बंद ; देशभरातील ठोक आणि किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार
पुढील बातमी
महामार्गावर पाचवड फाटा येथे भरधाव एसटीची चाके निखळली, सुदैवाने जीवितहानी टळली; वाहतूक झाली होती ठप्प

संबंधित बातम्या