शिवकालीन वारशाचा ठेवा खुला; साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात नवी तीन दालने

दालनांमुळे संग्रहालयातील पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली - अभिरक्षक प्रवीण शिंदे

by Team Satara Today | published on : 18 May 2026


सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वस्‍त्रदालन, चित्रदालन आणि संकीर्ण दालनामुळे इतिहासप्रेमींसाठी शिवकालीन वारशाचा अनमोल ठेवा खुला झाला आहे. या दालनांमुळे संग्रहालयातील पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली असून, राज्यासह देशभरातून इतिहास अभ्यासक आणि पर्यटक भेट देत आहेत.

वस्त्रदालनात १६ ते १८ व्या शतकातील पैठण्या, शेला, अंगरखे, पगड्या, घोड्यांची खोगिरे आणि बख्तर यांसारख्या पुरातन वस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले आहे. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीच्या या वस्तूंमधून तत्कालीन जीवनशैली आणि वैभवाचा परिचय घडतो. चित्र दालनात मिनिएचर पेंटिंग, ग्लास पेंटिंग, भित्तिचित्रे आणि पारदर्शक चित्रांचा समावेश असून, १६ ते १८ व्या शतकातील कलावैभव येथे अनुभवता येत आहे.

संकीर्ण दालनात तांब्याची भांडी, मूर्ती, लाकडी देव्हारे, तत्कालीन वाद्ये, बुद्धिबळपट, किल्ल्यांच्या दरवाजांची कुलपे, तेलाच्या बुधल्या आणि इतर शिवकालीन वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या दालनांमुळे नव्या पिढीला मराठेशाहीतील संस्कृती, कला आणि दैनंदिन जीवन समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संग्रहालय प्रशासनाच्या उपक्रमाचे पर्यटकांकडून स्वागत होत आहे.

शिवकालीन इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ही दालने सुरू करण्यात आली आहेत. पर्यटक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संग्रहालयात नव्याने सुरू केलेले दालने पाहण्यासाठी पर्यटकांनी आवर्जून उपस्थित राहावे.

- प्रवीण शिंदे, अभिरक्षक, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मांडवे येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील लाखो रुपयांच्या केबलची चोरी; शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण
पुढील बातमी
औषध विक्रेत्यांचा बुधवारी देशव्यापी बंद ; देशभरातील ठोक आणि किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार

संबंधित बातम्या