एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरेगाव तालुक्याची शेती होणार स्मार्ट; खरीप नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय : आमदार महेश शिंदे

by Team Satara Today | published on : 18 May 2026


कोरेगाव : तालुक्यातील खरीप हंगाम नियोजन बैठक सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, पिकांवरील रोग व कीड नियंत्रणात ठेवणे, मातीतील ओलावा व पोषकतत्त्वांचे अचूक परीक्षण करणे यासाठी AI आधारित यंत्रणा उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की, आमदार निधीतून AI स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. AI तंत्रज्ञानामुळे एका गावातील रोग दुसऱ्या गावात पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच पिकांना किती पाणी द्यावे, जमिनीतील मॉइश्चर किती आहे, पोटॅश किती प्रमाणात द्यावे, कोणती औषधे वापरावीत याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

बैठकीत माती परीक्षणासह विविध तपासण्यांसाठी सहा आधुनिक लॅब उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला. एका लॅबची किंमत सुमारे ४० लाख रुपये असून त्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले.

कोरेगाव तालुका ९८ टक्के सिंचनाखाली आणण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत रामोशवाडी ते भाडळे खोरे तसेच देऊर परिसरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी तालुक्यात फक्त ६ हजार हेक्टर ऊस होता, तो आज १३ हजार हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन वर्षांत हा आकडा ५० हजार हेक्टरपर्यंत नेण्याचा मानस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी गट, बचत गट आणि प्रगतशील शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उच्च पोटॅशयुक्त उत्पादनाचा प्रचार करण्याबरोबरच जीवामृत, व्हर्मी कंपोस्ट आणि हरित खतांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी धेंचा, ताग यांसारख्या हरित खतांच्या बियाण्यांचे उत्पादन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढून उत्पादनक्षमतेत वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

यावेळी एल निनोच्या संभाव्य परिणामाबाबत शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. “७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते,” असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले. तसेच बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची सोपी पद्धत कृषी विभागाकडून कार्यशाळांद्वारे शिकविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, कृषी विभागाचे अधिकारी आणि तालुक्यातील विविध शेतकरी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार - विनोद कुलकर्णी, जयंतीनिमित्त मावळा फौंडेशन, विविध संस्था, जनता सहकारी बँकेतर्फे अभिवादन
पुढील बातमी
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवकांसाठी विशेष शिबिर व मोबिलेझेशन कॅम्प

संबंधित बातम्या