श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार - विनोद कुलकर्णी, जयंतीनिमित्त मावळा फौंडेशन, विविध संस्था, जनता सहकारी बँकेतर्फे अभिवादन

by Team Satara Today | published on : 18 May 2026


सातारा  : हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे, सातारा नगरीचे संस्थापक श्री. छ. शाहू महाराज (थोरले) यांचे संगम माहुली येथे यथोचित स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरच बैठक होऊन सकारात्मक निर्णय होईल. जोपर्यंत याठिकाणी यथोचित स्मारक होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे मत मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

संगम माहुली येथे श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या जयंतीनिमित्त मावळा फौंडेशन, विविध सामाजिक संस्था, जनता सहकारी बँकेतर्फे अभिवादन करण्यात आले, त्यावेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्यावतीने श्री.छ. शाहूमहाराज (थोरले) यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शाहू महाराज हे अजातशत्रू होते. भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योध्दा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर त्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. संगम माहुली येथे त्यांचे यथोचित स्मारक होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न, पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात नंदकुमार सावंत यांनी केले. आभार अनिल जठार यांनी मानले. याप्रसंगी जनता बँकेचे संचालक वजीर नदाफ, जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, गुजराथी अर्बनचे व्यवस्थापक सतीश घोरपडे, तुषार महामूलकर, सचिन सावंत, संजय माने, संगम माहुलीची उपसरपंच अविनाश कोळपे, संगम माहुलीचे सर्व ग्रामस्थ, जनता बँक, गुजराथी अर्बनचे सर्व संचालक, कर्मचारी, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि सातारकर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजिंक्यतारासाठी १३४.८० कोटी, संगम माहुली संवर्धनासाठी १३३ कोटी भरीव निधीची तरतूद - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ऐतिहासिक वारसा जतनासाठी शासन कटिबद्ध
पुढील बातमी
एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरेगाव तालुक्याची शेती होणार स्मार्ट; खरीप नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय : आमदार महेश शिंदे

संबंधित बातम्या