सातारा : महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री तथा सातारा जिल्हा बँकेचे माजी ज्येष्ठ संचालक विकासरत्न स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुखे, संचालक सुरेश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. कांचन साळुखे यांनी स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य स्मरणात राहणारे असल्याचे सांगितले. उरमोडी धरणाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील शेती विकासाला मोठी चालना दिली असून, त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ त्या जलाशयाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
संचालक सुरेश सावंत यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भाऊसाहेब महाराजांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. समाजातील तळागाळातील घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केल्याचे त्यांनी सांगितले.
स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी विकासाची नवी दिशा निर्माण केली
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सहकार क्षेत्रात दूरदृष्टीने काम करत राज्यातील सहकार चळवळीला नवे बळ दिल्याचे सांगितले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सुतगिरणी आणि विविध उद्योग उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विकासाची नवी दिशा निर्माण केली, असे ते म्हणाले.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी त्यांनी ग्रीन हाऊस संकल्पनेला प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जिल्हा बँकेत विशेष हायटेक कृषी विभाग सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सातारा जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात विश्वासार्ह संस्था म्हणून वेगळी ओळख निर्माण केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.