तरडगाव परिसरात वादळ आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान; भैरवनाथ गोपालन संस्थेच्या गोशाळेचे पत्रे उडाले

by Team Satara Today | published on : 17 May 2026


फलटण : फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळ आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. या वादळाचा फटका तरडगाव येथील भैरवनाथ गोपालन संस्थेच्या गोशाळेला बसला असून गोशाळेच्या शेडवरील पत्रे उडून गेल्याने जनावरे उघड्यावर आली आहेत.

अचानक आलेल्या वाऱ्यामुळे गोशाळेच्या छतावरील अनेक पत्रे हवेत उडाली. काही ठिकाणी लोखंडी संरचनेचेही नुकसान झाले असून गोशाळेतील जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. वादळानंतर गोशाळा परिसरात पत्र्यांचे तुकडे दिसत होते.

रात्रीच्या वेळी जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व गोशाळा व्यवस्थापनाने तात्पुरती व्यवस्था केली. मात्र वाढते तापमान आणि अवकाळीचा धोका लक्षात घेता जनावरांसाठी संरक्षणाची तातडीची गरज निर्माण झाली आहे. गोशाळेमध्ये गायी, बैल आणि इतर जनावरे मिळून 80 पेक्षा अधिक जनावरे आहेत. छत उडाल्यामुळे जनावरांना उघड्यावर ठेवण्याची वेळ आली असून चारा आणि इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंगळवारी साताऱ्यात 'मौसम प्यार का' गाण्यांचा कार्यक्रम; दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर क्लबतर्फे आयोजन
पुढील बातमी
खंबाटकीच्या दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा - मंत्री नितीन गडकरी; खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याची केली पाहणी

संबंधित बातम्या