सातारा : शाहूपुरी परिसरात विश्वास संपादन करून एका व्यक्तीचा मोबाईल चोरी करत त्याच्या खात्यातून तब्बल ३१ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील आझादनगर कॉलनीतील गणेश मंदिरासमोर ९ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. फिर्यादी मनीष माधवराव डेरे (वय ५८, रा. राधिका चित्रपटगृहाशेजारी) यांचा विश्वास संपादन करून प्रेम डी. सुर्वे याने त्यांचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार आहे.
मोबाईल चोरी केल्यानंतर आरोपीने मोबाईलमधील आर्थिक व्यवहारांचा गैरवापर करत संबंधित खात्यातून सुमारे ३१ हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार राजगे पुढील तपास करत आहेत.