सातारा : किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाला गती देण्याबरोबरच हे काम दर्जेदार करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या संवर्धन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व किल्ले प्रतापगड येथील नागरिक उपस्थित होते.
किल्ले प्रतापगड संवर्धनाच्या बांधकामाला पाणी मारत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडावर कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरी संबंधित ठेकेदाराने टँकरने पाणी आणून पाणी मारावे. संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. तरी संवर्धनाच्या कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे किल्ले प्रतापगड होता त्याच पद्धतीने संवर्धनाचे काम झाले पाहिजे. किल्ल्यावरील झाडेझुडपे काढून संवर्धनाचे काम करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ जास्तीत जास्त झाडे लावावी. संवर्धनाच्या कामाच्या निधीसाठी पाठपुरावाही केला जाईल अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री देसाई यांनी पाहणी दरम्यान दिली.