स्व. भाऊसाहेब महाराज जयंतीनिमित्त १०१ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया; कर्तव्य सोशल ग्रुपच्या पुढाकारातून साताऱ्यात आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 16 May 2026


सातारा : क्रांतिसिंह पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालय, सातारा येथे स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास पालक व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लहान मुलांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकूण १०१ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या अनेक कुटुंबांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाला.

शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय ओक, डॉ. पारस कोठारी, सायन हॉस्पिटल मुंबईचे वैद्यकीय पथक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहूल जाधव व त्यांचे सहकारी, सातारा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. विनायक काळे व त्यांचे वैद्यकीय पथक तसेच सत्यसाई हॉस्पिटल मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी मुलांची तपासणी करून अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या.

कर्तव्य सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शिबिराचे नियोजन, रुग्ण नोंदणी, पालकांना मार्गदर्शन आणि वैद्यकीय समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. ग्रामीण भागातील अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शिबिरात आणून उपचाराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये बालरोग, जन्मजात विकार, शस्त्रक्रियेद्वारे उपचार होणारे विविध आजार यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजहित जपणारा हा उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रतापसिंहनगरमधील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी - पालकमंत्री शंभूराज देसाई ; प्रतापगड येथे सुरू असलेल्या संवर्धन कामाची प्रत्यक्ष पाहणी

संबंधित बातम्या