सातारा : ‘पुस्तकपर्व ग्रंथभांडार’यांच्यावतीने व दीपलक्ष्मी नागरिक सहकारी पतसंस्था यांच्या सहकार्याने दिलीपराज ग्रंथोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, विनोद कुलकर्णी, काका पाटील, श्रीराम नानल, राजेंद्र शेजवळ, विजय साबळे व शिरीष चिटणीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सदर उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे म्हणाले, दिलीपराज प्रकाशानाचे 'पुस्तक पर्व ' प्रदर्शन हा ग्रंथांचा उत्सव आहे. यानिमित्ताने साताऱ्यामध्ये पुस्तकांचे जग निर्माण झाले आहे.पुस्तके वाचकांना विश्वनागरिक करतात. पुस्तकांचे जग अफाट असते. पुस्तकाच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. सध्या माणूस मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तकांच्या जगापासून दूर जातो आहे. चटपटीत करमणूकीमुळे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. पुस्तके वाचकांना ताणतणावातून मुक्त करून चित्त प्रफुल्लित करतात आणि आत्मिक श्रीमंती बहाल करतात. घरातील टी.व्ही. फ्रीज सारख्या भौतिक वस्तूंमुळे घराला घरपण येते,पण पुस्तकांमुळे घराला शहाणपण येऊ शकते.आपण ज्ञानाला अमृत म्हणतो. उत्तम पुस्तक हे अमृतफळाचे झाड असते.
काका पाटील म्हणाले, दीपलक्ष्मी संस्कृतीक हॉलमध्ये नेहमीच पुस्तकांचे प्रदर्शन आणि ५० टक्के डिस्काउंट मध्ये ग्रंथ विक्री चालू असते.यावेळीही ५० टक्के किमतीत पुस्तक विक्री चालू आहे. हे प्रदर्शन १५ मे ते १५ जून पर्यंत सुरू आहे तरी सातारकरांनी, तरुण-तरुणींनी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
शिरीष चिटणीस म्हणाले दिलीपराज प्रकाशन यांनी महाराष्ट्रभर हा उपक्रम चालू केला आहे. 35% सवलतीच्या दारात पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. माझ्या वाचनात एक आलं स्वीडन देशात बालवाडी पासून मुलांना टॅब दिले जातात.तेथील शासनाला पंधरा वर्षानंतर लक्षात आले की नवीन पिढी अभ्यासात मागे पडत चालली आहे.त्यांचे पुस्तकाचे वाचन कमी झाल्यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.म्हणून त्यांनी आत्ता ९०० कोटी पेक्षा जादा खर्च करून शाळांमध्ये वह्या, पुस्तके, पेन्सिल, पेन देऊन पुन्हा प्रत्येक वर्गा वर्गात हा पूर्वीचा प्रोजेक्ट चालू केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचनाची आवश्यकता जास्त आहे.