सातारा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साताऱ्यात आयोजित घरकुल वितरण कार्यक्रम भाजपसाठी राजकीय शक्तिप्रदर्शन ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विकासकामे, ग्रामीण भागातील गृहनिर्माण, शेतकरी प्रश्न आणि सहकार क्षेत्रातील अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली.
कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
सैनिक स्कूल मैदानावर झालेल्या या सोहळ्यात हजारो लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाचे घर उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घरकुल योजना राबविण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले, “अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर घरकुलांची उभारणी करून ग्रामविकास विभागाने उल्लेखनीय काम केले आहे. ग्रामीण विकासाच्या योजनांमध्ये सातत्य आणि गती दिसून येत आहे.महाराष्ट्राने विक्रमी वेळेत पाच लाख घरे उभारण्याचा विक्रम केला असून याचे श्रेय ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासनाला जाते असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जयकुमार गोरे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.
पत्रकार परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचे सांगितले. “बाजारातील अस्थिरतेमुळे कांदा उत्पादक अडचणीत आले असले, तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरीच्या संदेशाचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. “शासनाच्या प्रत्येक रुपयाचा उपयोग लोककल्याणासाठी झाला पाहिजे. अनावश्यक खर्च कमी करून विकासकामांना गती देणे, हीच सरकारची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगासंदर्भात बोलताना त्यांनी सहकार क्षेत्रातील प्रश्न गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट केले. “साखर कारखाने, ऊस उत्पादक आणि सहकार क्षेत्राच्या अडचणींबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
याच दौऱ्यात शाहू चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा गौरव करताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साठे यांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह भाजप आणि महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.