सातारा : सातारानगरीत उत्साहपूर्ण वातावरण, आतषबाजी आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. सातारा नगर परिषदेच्या वतीने नगर परिषदेसमोर उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याने शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, सुनील कांबळे, अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रती भेट देऊन स्वागत केले.
यानंतर सातारा सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकचळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “अण्णाभाऊ साठे म्हणत असत की, ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तोललेली नसून ती कामगारांच्या कष्टावर उभी आहे. समाजरचनेत कामगार चळवळीचे मोठे योगदान असून लोकचळवळीच्या या ऊर्जाकेंद्राला मी मनापासून अभिवादन करतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुतळा अनावरण सोहळ्यामुळे साताऱ्यात सामाजिक आणि सांस्कृतिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.