हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या ५२ व्या पर्वाचा दमदार शुभारंभ; दमदार डावपेचांनी रंगला पहिला दिवस, दांडपट्ट्याच्या प्रात्यक्षिकाने उद्घाटन सोहळ्याला वेगळीच ऊर्जा

by Team Satara Today | published on : 15 May 2026


सातारा  : सातारच्या लाल मातीत शुक्रवारी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या ५२ व्या पर्वाचा दमदार शुभारंभ झाला. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्ती शौकीनांच्या उत्साहात छत्रपती शाहू स्टेडियम परिसर अक्षरशः कुस्तीमय बनला होता. उद्घाटनानंतर लगेचच आखाड्यात रंगलेल्या प्राथमिक लढतींमध्ये देशभरातील मल्लांनी ताकद, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त नजराणा सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते आखाड्यात पारंपरिक कुस्ती लावण्यात आली. त्यानंतर हिंदकेसरी किताबासाठीच्या लढतींना अधिकृत सुरुवात झाली. मैदानात उतरणाऱ्या प्रत्येक मल्लाच्या स्वागतासाठी टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा गजर सुरू होता.

यावेळी जागतिक कुस्ती संघटनेच्या अध्यक्षा तथा किर्गीस्तानच्या माजी उपपंतप्रधान सुलताना बेकोवा, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे अध्यक्ष हिंदकेसरी संजयकुमार, रामाश्रय यादव, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र अध्यक्ष नितीन बारणे, सचिव गौरव रोशनलाल, कुस्ती महर्षी साहेबराव पवार, ऑलिम्पिकवीर अशोक गर्ग, मोहन खोपडे, राजबीरसिंह, चंद्रकांत सूळ, माणिक पवार, जीवन कापले आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा तालीम संघाचे सचिव सुधीरनाना पवार यांनी प्रास्ताविकात सातारच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा गौरव करत “ही लाल माती देशाला अनेक हिंदकेसरी घडवणारी आहे,” असे सांगितले. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी अडचणींवर मात करत स्पर्धा यशस्वीपणे उभारल्याचा आनंद व्यक्त केला.

सायंकाळी रंगलेल्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये अनेक चुरशीच्या झुंजी पाहायला मिळाल्या. काही मल्लांनी चितपट डावांनी प्रतिस्पर्ध्यांना काही क्षणांत मात दिली, तर काही लढती शेवटच्या क्षणापर्यंत रंगल्या. माती उडवत खेळल्या जाणाऱ्या या झुंजींनी कुस्तीप्रेमींना खऱ्या अर्थाने हिंदकेसरीची अनुभूती दिली.

दांडपट्ट्याने रंगला उद्घाटन सोहळा

स्पर्धेपूर्वी अतित येथील पथकाने सादर केलेल्या दांडपट्ट्याच्या प्रात्यक्षिकाने उद्घाटन सोहळ्याला वेगळीच ऊर्जा मिळाली. विजेच्या वेगाने फिरणारे दांडपट्टे, तलवारींचे अचूक वार आणि मर्दानी खेळाचा थरार पाहून प्रेक्षक रोमांचित झाले. किर्गीस्तानच्या माजी उपपंतप्रधान सुलताना बेकोवा यांनीही हा अनोखा मराठमोळा खेळ मोबाईलमध्ये चित्रित करत कलाकारांचे विशेष कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस : सात दिवसात माफी मागा; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा
पुढील बातमी
साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण, कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार

संबंधित बातम्या