सातारा : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच लाख घरकुलांच्या वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ साताऱ्यात होणार असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून ग्रामीण भागात राजकीय संदेश देण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सैनिक स्कूल मैदानावर हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी सैनिक स्कूल मैदानावरील जर्मन हँगर व इतर सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन, भाजपचे लोकसभा संयोजक सुनील काटकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, राहुल शिवनामी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ३० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पाच लाख घरकुले पूर्ण झाली असून, त्यांचे वितरण साताऱ्यातून करण्यात येणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी सुरुवातीला ४० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित धरली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानुसार उपस्थिती संख्या १५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आल्याचा दावा गोरे यांनी केला. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी एसटी बसचे नियोजन करण्यात आले असून, सकाळी साडेअकरा वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे भाजपच्या शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न होणार असून, यामधून पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील भाजप संघटनेतील विविध गटांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घरकुल वितरणाच्या कार्यक्रमाबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना कोणता राजकीय संदेश देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.