सातारा : घरात एकटी असलेल्या ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी शेजाऱ्याने गैरवर्तन केल्याची गंभीर घटना दि १३ रोजी सकाळी ११ ते ११:४५च्या दरम्यान उघडकीस आली असून, याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या घरातील हॉलमध्ये मुलगी टीव्ही पाहत बसलेली असताना, शेजारी राहणारा गंगाराम बिरु बावधने (वय ३०) हा घरात येऊन मुलीच्या अंगाला अयोग्य स्पर्श केल्याची तक्रार आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही हा प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करीत आहेत.