सातारा : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीटेकडी, सदरबझार परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी संगनमताने अल्पवयीन मुलावर कु-हाड, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी हल्ला केल्याची घटना ११ मे रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात अनिकेत दीपक घाडगे (वय १७, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लक्ष्मी टेकडी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
या प्रकरणी अनिकेत घाडगे याने दिलेल्या फिर्यादीवरून यश संतोष शिवपाल, आर्यन शिवपाल आणि तेजस शिवपाल (सर्व रा. सदरबझार, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अनिकेत घाडगे याला लक्ष्मीटेकडी येथे नेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत.