सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकाशवाणी केंद्र ते राम मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात युवकावर दगडाने हल्ला झाल्याची घटना १२ तारखेला सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी यश गणेश जाधव (वय २५, रा. आकाशवाणी केंद्र, गेंडामाळा, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी जाधव हे आपल्या चारचाकी स्कोडामधून चुलती गौरी संदीप जाधव यांना घेऊन कॅनरा बँकेत जात असताना पाटोळे यांच्या घरासमोर एक दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी असल्याने त्यांनी हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आदित्य महेश बाबर या दुचाकीस्वाराने शिवीगाळ सुरू केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन आईवरून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व तेथेच पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस मारल्याने तो जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी आदित्य महेश बाबर (वय २३, रा. आकाशवाणी केंद्र, गेंडामाळा, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.