तांत्रिक तपासातून सातारा शहर पोलिसांची प्रभावी कारवाई ; हरवलेले ८० मोबाईल शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द; मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांना दिलासा

by Team Satara Today | published on : 12 May 2026


सातारा : हरवलेल्या मोबाईलच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. शहर पोलिसांनी आधुनिक तांत्रिक यंत्रणा आणि सीईआयआर प्रणालीच्या सहाय्याने तब्बल ८० हरवलेले मोबाईल शोधून काढले असून, अंदाजे १६ लाख रुपये किमतीचे हे स्मार्टफोन संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सातारा शहर परिसरातून विविध कारणांनी मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने स्वतंत्र मोहीम हाती घेत तपास सुरू केला. मोबाईलचा आयएमईआय क्रमांक, सीईआयआर पोर्टलवरील माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी विविध भागांत मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोच साधली.

तपासादरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांमधूनही अनेक मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. मोबाईल वापरणाऱ्या धारकांशी संपर्क साधून संबंधित उपकरणे ताब्यात घेण्यात आली. मंगळवारी आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या उपस्थितीत हे मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले. सातारा शहर हे व्यापारी, शैक्षणिक आणि प्रवासी दळणवळणाचे केंद्र असल्याने शहरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बसस्थानके, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोबाईल हरविण्याच्या घटना वारंवार घडत असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच डीबी पथक आणि सायबर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. हरवलेले मोबाईल शोधण्याची कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एम.आर.पी. च्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा ; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य सरकारची मोठी मोहीम; खासगी शाळांवर शिक्षण विभागाचा वॉच, टीईटी पात्रतेची होणार सखोल तपासणी

संबंधित बातम्या