सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत व काटकसरीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्र्यांचे वाहन ताफे, विशेष सुरक्षा व्यवस्था तसेच हेलिकॉप्टर व विमान दौऱ्यांवरील सार्वजनिक खर्चाचे पुनर्मूल्यांकन करून खर्च नियंत्रण धोरण लागू करावे, अशी मागणी मल्हार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. वैभव मोरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्हाधिकारी तसेच सातारा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विविध मंत्री, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यांकरिता मोठ्या प्रमाणावर वाहन ताफे, पोलीस बंदोबस्त व विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येते. तसेच हेलिकॉप्टर व विमान सेवांवरही मोठा सार्वजनिक खर्च होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सार्वजनिक निधीचा काटकसरीने व जबाबदारीने वापर होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काही राजकीय व सार्वजनिक व्यक्तींना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे वस्तुनिष्ठ निकषांवर पुनर्मूल्यांकन करावे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष सुरक्षा धोका अथवा कायदेशीर आवश्यकता नाही, त्या ठिकाणी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
सामान्य नागरिक महागाई, इंधन दरवाढ व आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना शासनानेदेखील इंधन बचत व खर्च नियंत्रणाबाबत आदर्श निर्माण करावा, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
तसेच बांधकाम मंत्री छ. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी तुलनेने अल्प सुरक्षा व्यवस्थेसह जनतेत मिसळून काम करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करत लोकाभिमुख प्रशासनासाठी साधेपणा व संयम आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाने मंत्र्यांचे वाहन ताफे, सुरक्षा व्यवस्था व हवाई दौऱ्यांसंदर्भात स्पष्ट खर्च नियंत्रण धोरण जाहीर करून सार्वजनिक निधीचा पारदर्शक व जबाबदार वापर सुनिश्चित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.