संत-महंतांनी समाजप्रबोधनात सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक - हेमंत हरहरे; धर्माचार्य परिषद उत्साहात

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सातारा येथे आयोजित धर्माचार्य परिषदेत हिंदू समाजातील ऐक्य, सामाजिक समरसता आणि संस्कृती संवर्धन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. धार्मिक क्षेत्रातील संत, महंत, कीर्तनकार, मठाधिपती, मंदिर ट्रस्टी तसेच विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत श्री श्री शांतिगिरीजी महाराज, प.पू. शिवयोगी नंदगिरीजी महाराज, संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे व प्रांत समरसता संयोजक मुकुंदराव आफळे प्रमुख उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रास्ताविकात गोपीनाथ कुलकर्णी यांनी धर्माचार्य परिषदेमागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर हेमंत हरहरे यांनी संघाच्या शताब्दी प्रवासाचा आढावा घेताना हिंदू समाजासमोरील विविध सामाजिक व सांस्कृतिक आव्हानांवर भाष्य केले. “समाजात भेदाभेद वाढवण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन संस्कृती रक्षणासाठी कार्य केले पाहिजे. संत-महंतांनी समाजप्रबोधनात सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुकुंदराव आफळे यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करत सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, कुटुंब व्यवस्था आणि नागरी शिस्त या विषयांवर विचार मांडले. समाजपरिवर्तनासाठी कृतीशील सहभागाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

आशीर्वचनात शांतिगिरीजी महाराज यांनी सनातन संस्कृतीच्या जतनासाठी सर्व धार्मिक शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन केले. शिवयोगी नंदगिरीजी महाराज यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसाद गरगटे यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील नुने येथील केमिकल कंपनीत आग; धुराच्या लोटांमुळे मेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत : अग्निशमन दलाची शर्थीची झुंज
पुढील बातमी
५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचे साताऱ्यात भव्य आयोजन; १४ ते १७ मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियममध्ये रंगणार राष्ट्रीय कुस्तीचा महासंग्राम

संबंधित बातम्या