सातारा तालुक्यातील नुने येथील केमिकल कंपनीत आग; धुराच्या लोटांमुळे मेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत : अग्निशमन दलाची शर्थीची झुंज

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा : सातारा–मेढा रस्त्यालगतच्या नूने परिसरात सोमवारी सायंकाळी एका रासायनिक पदार्थ साठवण गोदामाला अचानक आग लागून मोठी खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसर काळ्या धुराने व्यापून गेला होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाने या आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या अग्नितांडवाची दाखल घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुपर एजन्सी’ नावाच्या गोदामात विविध प्रकारचे ज्वलनशील रसायने आणि पेंटसंबंधित साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गोदामातून धूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच आगीचे लोळ उसळू लागल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.

घटनास्थळी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. रसायनांचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. जवळपास दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सातारा तालुका पोलिसांनी परिसर बंदिस्त करत काही काळ वाहतूक रोखून धरली होती. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामातील साहित्य पूर्णतः जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून विद्युत बिघाड किंवा रासायनिक अभिक्रियेमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून तपास आणि पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येईल, ते सर्वांनाच मिळून आणावं लागेल : लोकशाहीर संभाजी भगत, १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा समारोप उत्साहात
पुढील बातमी
संत-महंतांनी समाजप्रबोधनात सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक - हेमंत हरहरे; धर्माचार्य परिषद उत्साहात

संबंधित बातम्या