सातारा : ऐतिहासिक सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जंयती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेलं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वीपणे पार पडलं. या संमेलनाच्या समरोप सत्रात संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत,कॉ. सुबोध मोरे, अॅड. वर्षाताई देशपांडे, वाहरु सोनवणे, अविनाश कदम आणि कॉ. धनाजी गुरव यांची भाषणे झाली.
आपल्याला या संमेलनानंतर काय करायचं आहे हे ठरवावं लागेल. देशातील नवं आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येणार आहे. नव्या युगाचं नवं सांस्कृतिक राजकारण सर्व समाजवादी, आंबेडकरवादी इत्यादींना सोबत घेण्यासाठी समिती करुन नेत्यांना भेटणार आहे. नवं सांस्कृतिक राजकारण आपल्या सर्वांना मिळूनच आणावं लागेल,असं संभाजी भगत यांनी म्हटलं. यावेळी लोकशाहीर संभाजी भगत यांनी ये हिटलर के साथी हे गीत सादर केलं.
विचारधारा संपलेल्या पक्षांना विचार दिला पाहिजे : अॅड. वर्षाताई देशपांडे
एकमेकांसोबत असणारी मंडळी आपण सोबत आलोत ही चांगली गोष्ट आहे. आपल्याच मुलांचा आज बुद्धीभेद केला जातोय, त्यांना आमच्यात समोर उभं केलं जात आहे. या मुलांना परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांकडे जावं लागेल. पालकांशी बोलून त्यांना आपल्या वारशाची जाणीव करुन देऊन मुलांना परत आणलं पाहिजे, असं वर्षाताई देशपांडे यांनी म्हटलं.
आपल्या प्रतिकांना जाणीवपूर्वक पळवून नेण्याचं काम सुरु आहे. लोकशाही वाचवण्यासाठी संसद, विधानसभेसमोर जाण्यापूर्वी आपण गावात गेलं पाहिजे आणि गावांची ताकद उभी केली पाहिजे. सांस्कृतिक विचारधारा देणाऱ्या मंचावर भविष्यकाळात विचारधारा संपलेल्या पक्षांना विचार देण्याचं काम व्हायला पाहिजे, असं वर्षाताई देशपांडे यांनी म्हटलं.
चळवळ कृतीशील करुया : अविनाश कदम
पहिलं विद्रोही साहित्य संमेलन धारावीत झालेलं होतं. देशातील निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता आपण केलेलं काम वाया गेलं का याचा विचार केला पाहिजे. २७ वर्ष झाल्यानंतर विद्रोहीची चळवळीची पद्धत बदलायला पाहिजे का याचा विचार केला पाहिजे. सांस्कृतिक राजकारण कसं केलं पाहिजे, चळवळ तळागळात कशी पोहोचेल, रस्त्यावरचा, वस्त्यांवरचा माणूस चळवळीत कसा येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.लोकं स्वत:हून चळवळीत कृतीशील सहभागी होतील यासाठी संकल्प करुया, असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते अविनाश कदम यांनी म्हटलं.
आदिवासी हे वनवासी नसून मूलनिवासी : वाहरुभाऊ सोनवणे
विद्रोह कशाच्या विरोधात आहे? विद्रोही साहित्य संमेलनात जमलेला समुह मानव आहे, मानवजातीच्या समुहाला येणाऱ्या अडचणींना ठोकर मारत जाण्याचा मार्ग म्हणजे विद्रोह आहे.मानवमुक्तीच्या विचारानं घर विद्रोही झालं पाहिजे, गाव विद्रोही झालं पाहिजे, महाराष्ट्र विद्रोही झाला पाहिजे. इथला आदिवासी समुह हा वनवासी नसून इथला मूलनिवासी आहे. अन्याय अत्याचार, दमनाला विरोध करणारा विद्रोही आहे. साहित्य संस्कृती संमेलनात मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असं वाहरुभाऊ सोनवणे यांनी सांगितलं
कॉ. सुबोध मोरे यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं इतर पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या १२५ व्या वर्षानिमित्त आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या २०० व्या वर्षानिमित्त अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करावेत असं त्यांनी म्हटलं.
कॉ. प्रशांत अंबी यांचा सत्कार
कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या पुस्तकावरुन झालेल्या वादानंतर त्यांनी शिवाजी कोण होता? हे पुस्तक लाखो वाचकांपर्यंत आणि शिवप्रेंमीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. यानिमित्तानं प्रशांत अंबी यांचा सत्कार करण्यात आला.
विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचा निषेध
भागवत वारकरी संप्रदायात संघर्ष सुरु आहे. संतांचा विचार आणि मनुवादी विचार असा तो संघर्ष आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून खरे विचार मांडण्याचं काम विकास लवांडे यांनी केलं. जातीयवादी वक्त्यानं त्यांच्यावर शाईफेक केली आहे त्या भ्याड कृतीच्या निषेधाचा ठराव १५ वे विद्रोही साहित्य संमेलनाच्यावतीनं करण्यात आला.
देशातील लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला लक्ष घालावं लागेल. चळवळीत युवकांनी नेतृत्त्व हाती घ्यावं असं कॉ. धनाजी गुरवा यांनी म्हटलं.
समारोप सत्रात संमेलन संयोजन समितीचे डॉ. प्रशांत पन्हाळकर,अॅड. राजेंद्र गलांडे, दिनकर दळवी, अॅड. सत्यवान कमाने, प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, आयु. हणमंत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनातील विविध ठराव कॉ. धनाजी गुरव यांनी मांडले, ते ठराव समारोप सत्रात उपस्थित असणाऱ्या सर्वांनी टाळ्या वाजवून मंजूर केले. समारोप सत्रात विविध ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांची अंमलबजावणी व्हावी यासाठी कालमर्यादा घालून त्यासाठी प्रयत्न करावेत, त्याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा मार्ग निवडला पाहिजे, असा ठराव यावेळी करण्यात आला.
१५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनातील सातारा ठराव
१.अजिंक्यताऱ्यावर शाहू महाराज थोरले आणि महाराणी ताराबाई यांचा भव्य पुतळा व मोठे स्मारक व्हावे.
२.किल्याच्या दगडी रचणे सोबतच किल्याच्या इतिहासाला महत्त्व द्यावे.
३.शनिवार वाड्यासमोर महादजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे भव्य पुतळे उभारावे.
४.शनिवार वाड्यात छ. संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराजांचा सिंहासनाधीष्ट पुतळा उभारावा.
५.साताऱ्यात भव्य प्रतिसरकारचे स्मारक उभारावे.
६.शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्के खर्च करावा सर्व शिक्षण सर्वाना समान आणि मोफत असावे. एकही मराठी सरकारी शाळा बंद होता कामा नये.
७.पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्या महापूजेतील पुरुषसुक्त बंद करून वारकरी संतांचे अभंगाच्या आधारे महापूजा करावी.
८.महाराष्ट्र सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे एसटी ला झालेला 10 हजार कोटीचा संकलित तोटा भरून काढून आवश्यक निधी एसटी ला देऊन आणि आधुनिक करून पूर्व एसटी पदावर आणावी.
९.छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामी बद्दल विश्वास पाटील आणि राम गणेश गडकरी त्यांची परंपरेचा यांचा निषेध करतो
१०.छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील बदनामी कारक लिखाण पुराव्याच्या आधारे दुरुस्ती करावे अथवा महाराष्ट्र सरकारने अशा साहित्यावर बंदी घालावी.
११.भिमाबाई स्मारक व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साताऱ्यातील राहते घर यामध्ये सरकारने लक्ष घालून लवकरात लवकर स्मारक पूर्णत्वास न्यावे
१२.महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
१३.मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे.
१४.अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव येथे भव्य स्मारक करावे आणि त्यांचे विचार, कार्य व कला क्षेत्रातील योगदान दाखविणारे भव्य संवशोधन केंद्र वाटेगावच्या हद्दीत उभारावे.
१५.रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे करावे.
१६.आदिवासींना वनवासी किंवा जनजाती म्हणून उल्लेख करणे हे अनैतिहासिक तसेच समाजशास्त्रीय दृष्ट्या चुकीचे आणि बदनामीकारक आहे. आदिवासींना आदिवासीच म्हणावे. तसेच जनगणना करताना आदिवासी चळवळींच्या मागणी प्रमाणे आदिवासी धर्म कोड करुन नोंदणी करावी.
१७. जनगणना करताना जातवार जनगणना करावी.
१८.बेळगावसह सर्व मराठी मुलुख महाराष्ट्रसोबत जोडला जावा.
१९. शक्तीपीठ रद्द करण्यात यावा.