कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजात सिंथेटिक ट्रॅक उभारा - एक्स डीपीयन्स तथा माजी विद्यार्थी संघटनेचे शरद पवार यांना साकडे

by Team Satara Today | published on : 09 May 2026


कोरेगाव : रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मैदानावर सिंथेटिक ट्रॅक उभारण्याची मागणी आज महाविद्यालयाच्या एक्स डीपीयन्स तथा माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सुनील खत्री, डी. पी. भोसले महाविद्यालयाचे माजी 

विद्यापीठ प्रतिनिधी तथा माजी जनरल सेक्रेटरी पांडुरंग बर्गे यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने श्री. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रयत शिक्षण संस्थेचे कोरेगाव येथे डी. पी. भोसले महाविद्यालय असून, या महाविद्यालयाच्या  मैदानावर सन २०१४-१५ मध्ये ४०० मीटरचा सहा लेनचा मातीचा ट्रॅक तयार केलेला आहे. हा ट्रॅक झाल्यापासून महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धांमध्ये दोन, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये

६० ते ६५  आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 50 पदके मिळवली आहेत. या यशामुळे शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे एका पत्राद्वारे अभिनंदनही केलेले आहे. परंतु, अलिकडे राज्यस्तरापासून पुढे सर्व स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवर होत असल्याने व महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांचा सराव मातीच्या ट्रॅकवर असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. भव्य मैदानामुळे डी. पी. भोसले महाविद्यालयात कोरेगाव तालुक्यातीलच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातूनही विद्यार्थी घेण्याकडे कल वाढलेला आहे.

या मैदानामुळे २०१४ पासून आजपर्यंत कोरेगाव व खटाव तालुक्यातील ७०० ते ८०० मुले व मुली आर्मी, एअर फोर्स व पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. खेड्या- पाड्यातून येवून शेतकरी कुटुंबातील मुलांनी या मैदानाचा लाभ घेतला आहे. या बाबीचा विचार करून व काळाची गरज लक्षात घेऊन डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सिंथेटिक ट्रॅक तयार करणे गरजेचे आहे. तेव्हा आपण व्यक्तीशः लक्ष घालून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने अथवा केंद्र वा राज्य शासनाच्या निधीतून भोसले महाविद्यालयाच्या मैदानावर सिंथेटिक ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

शिष्टमंडळात एक्स डीपीयन्स तथा माजी विद्यार्थी संघटनेच्या प्राचार्य अरुण एकनाथराव बर्गे, चंद्रकांत रावसाहेब बर्गे, विजयकुमार शंकरराव घार्गे, दिपक शंकरराव देवरे यांचाही समावेश होता.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गजवडी येथे दुकानासमोरून दुचाकी चोरीस

संबंधित बातम्या