सातारा : साताऱ्यातील संगमनगर परिसरात शासकीय मेडिकल कॉलेजच्या गेटजवळ एका तरुणावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत अनिरुद्ध जाधव (वय २८, रा. चिंचणी निंब, ता. जि. सातारा) हे शासकीय मेडिकल कॉलेज, संगमनगर येथील गेटजवळ असताना आरोपी चंद्रकांत अशोक सकरनवर व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी मुलाने त्यांना शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी खाली आले असता, आरोपींनी तेथे पडलेले स्टम्पसारखे लाकडी दांडके उचलून त्यांच्या डोक्यावर प्रहार केला.त्यावेळी दुसऱ्या अनोळखी मुलानेही लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हातावर व पाठीवर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्यानंतर दोन्ही आरोपी दांडके टाकून घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी चंद्रकांत अशोक सकरनवर व एका अनोळखी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.