सातारा : तालुक्यातील भोंदवडे गावच्या हद्दीत गजवडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर भरधाव रिक्षाचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिचा दोन वर्षीय मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ( भोंदवडे, ता. सातारा) येथे तुकाराम दाजी गुजर यांच्या घराजवळ गुरुवारी (दि. ८) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमीट रिक्षा क्रमांक एमएच/११/सीजे/४०३४ वरील चालक सईद मज्जिद इनामदार (वय ५१, रा. समर्थगाव (पुनर्वसन), पोस्ट अतीत, ता. जि. सातारा, मूळ रा. मंगळवार पेठ, शिर्के चौक, सातारा) हा रिक्षा अविचाराने, हयगयीने व भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारताना रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षाचे संतुलन बिघडले.
या अपघातात रिक्षामधील स्वाती प्रतीक चव्हाण (वय ३०, सध्या रा. शिवराम सोसायटी, शास्त्रीनगर, डोंबिवली पश्चिम, मुंबई; मूळ रा. सरफडेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) व त्यांचा दोन वर्षीय मुलगा प्रणीत प्रतीक चव्हाण हे रिक्षाबाहेर फेकले गेले. दोघेही रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले.
अपघातात स्वाती चव्हाण यांच्या डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाली होती. तसेच प्रणीतच्या कपाळ, पोट व पायाला दुखापत झाली आहे. रिक्षातून बाहेर फेकले गेल्याने स्वाती चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी बहीण सारिका रविराज आरगडे (वय 43, मूळ रा. आरगडवाडी, पोस्ट दहिवड, ता. जि. सातारा; सध्या रा. सरस्वती टॉवर, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व, पालघर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात रिक्षाचालक सईद इनामदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत