सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि एकनाथ शिंदे गटाच्या सदस्यांना भाजपने फोडले. पैशाचा, दबावाचा धमकीचा वापर करुन हे सदस्य फोडले. आता हे जे सातार्यात घडले ते उद्या आमदारकीच्या बाबतीत घडणार नाही, असा जर भाजपचे मित्र पक्ष विचार करत असतील तर ते वेगळ्याच स्वप्नात त्या ठिकाणी बसलेले आहेत. आजच सांगतो, 2029 मध्ये भाजप त्यांच्या मित्रपक्षाचे 40 आमदार फोडून भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल. त्यामुळे कोणतेच स्वप्न बघता येणार नाही, पळताभुई थोडी होईल. त्यामुळे आजच ती वेळ आहे, भाजपच्या विरोधात रस्त्यावर येवून लढण्याची. त्यानुसार लढा, लोकांचा विश्वास जिंका, सत्ता नक्कीच उद्या भाजपच्या विरोधातील येवू शकते, असे आ. रोहीत पवार यांनी सांगितले.
रोहीत पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारी सर्वांना ठेवायला लागणार आहे. पक्षाची सत्ता नसल्याने काही प्रमाणात थोडीशी नाराजी होत असते. पण आपल्याला रस्त्यावर उतरुनच लढावे लागणार आहे. कार्यकर्ते नक्कीच आपल्या विचाराचे आहेत, ते नक्की लढतील. काही प्रमाणात वरच्या लेव्हलला कन्फ्यूज असतील तर आ. शशिकांत शिंदे हे पदाधिकारी यांच्यामध्यील मतभेद दूर करतील.
पद घेवून बसण्यापेक्षा लढणे महत्वाचे आहे. जे लढत आहेत त्यांना ताकद द्या, जे लढत नाहीत त्यांना वेगळे पद द्या किंवा त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आ. शशिकांत शिंदे निर्णय घेतील. आम्ही कार्यकर्ते आहोत. मलाही भविष्य आहे. जसा मला प्रश्न पडतो, तसाच साध्या कार्यकर्त्यांनाही पडत असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासाठी सर्वांनी रस्त्यावर येवूनच लढावे लागणार आहे. तरच लोकांचा विश्वास वाढणार आहे. जर नाहीच काय केलं, तर उद्या मोठ्या प्रमाणात अडचणी येवू शकणार आहेत.
नगरपरिषद, जिल्हा परिषदेतील सदस्य फोडून भाजप राजकारण करत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान असेल, महिला व लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, या सर्व गोष्टीकडे भाजप सरकारला काही देणंघेणं राहिलेले नाही. या सरकारला फक्त राजकारण पडलं आहे, त्याशिवाय ते दुसरे काहीच करत नाहीत.
आता शक्ती कायद्यासाठी आम्ही मुद्दा मांडत असताना जर भाजपच्या प्रवक्त्या त्याला राजकारण म्हणत असतील तर त्यांचा अभ्यास कच्चा दिसत आहे. भाजपमध्ये केवळ व्यक्तीपूजनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बोलताना जरा विचार करुन भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलले तर बरे होईल.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य फुटले आहेत. त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे. यावर रोहीत पवार म्हणाले, कारवाई होणार नाही. कारण आज भाजपच स्वत: बरोबर एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या पक्षाला चालवत आहे. त्यामुळे अजून वेगळे काय बघायचे आहे? आपला कार्यकर्ता सहजपणे निवडून येतो आणि भाजप फोडत असेल तर त्याविषयी एक शब्द जर बोलला जात नसेल तर तुम्ही किती भाजपच्या दावणीला बांधला गेला आहात, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध लढायची तयारी ठेवली तरच पक्षांचे अस्तित्व राहणार आहे, असे ते म्हणाले.