सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज त्यांच्या नियोजित सातारा जिल्हा दौर्यावर येणार होते. मात्र, पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुबेंदु अधिकारी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे देवून गडकरींनी सातारावासियांना चकवा दिल्याने त्यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा तामझाम मात्र पाण्यात गेला आहे.
किसनवीर कारखान्याच्यावतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला होता. त्यानुषंगाने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, त्यांचे बंधू खा. नितीन पाटील यांनी कार्यक्रमाची जोरदार तयारीही केली होती. त्याच अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरवळ येथील पंढरपूर फाट्यानजिक लोणंद-शिरवळ राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे तसेच लोणंद-सातारा मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन व कोनशीला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच ना. गडकरी खंबाटकी घाटातील नव्याने सुरु केलेल्या बोगद्याचीही पाहणी करणार होते, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले होते.
नितीन गडकरी सातारा जिल्हा दौर्यावर येणार असल्याने गेल्या आठ दिवसांपासूनच जिल्हा प्रशासनाने या दौर्यामध्ये कोणतीही कसर राहू नये, यासाठी कंबर कसली होती. गेल्या काही वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गाची दुर्दशा झालेली होती. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उड्डाणपुलांची रखडलेली निर्माणाधीन कामे, नामशेष होण्याच्या मार्गावरील सेवारस्ते यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्या वाहनचालकांना नाहक त्रास होत होता. त्यामध्ये आनेवाडी आणि खेड शिवापूर येथील टोलनाक्यांचा भुर्दंड वेगळाच. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबतच्या तक्रारी नितीन गडकरी यांच्यासह त्यांच्या कार्यालयाकडे केल्या जात होत्या. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेमध्ये नितीन गडकरी आणि त्यांच्या मंत्रालयाबाबत प्रक्षुब्धतेचे वातावरण होते.
याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी बर्याच अवधीनंतर सातारा जिल्हा दौर्यावर येत असल्यामुळे अनेकांना आपल्या अश्रूंना मोकळी वाट करण्याची संधी मिळाली होती. जिल्ह्यातील माध्यमांसह सोशल मीडियावरही गडकरींच्या या दौर्याबाबत कोपरखळ्या आणि चिमटे घेतले जात होते. ना. गडकरींच्या या दौर्याच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरण कमालीचे ऍक्टिव्ह झालेले होते. आपल्या आब्रुची लक्तरे ना. गडकरींना दिसू नयेत, याची पुरेपूर खबरदारी प्राधिकरणाने घेतली होती. पुणे-सातारा मार्गावरील ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. सेवारस्ते चकाचक करण्यात आले होते. खंबाटकी घाटात पांढरे पट्टे आणि खराब झालेले रोलिंग बॅरेकेट्स पूर्णत: बदलण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध असणारे दुभाजकही सुस्थितीमध्ये करण्यात आले होते.
एकंदरीतच गडकरींच्या नियोजित दौर्याने पुणे-सातारा महामार्गाचा नूरच पालटवण्यात महामार्ग प्राधिकरणाला यश आले होते. त्यामुळेच ‘गडकरी साहेब, असेच येत चला’ ही पंचलाईन कालपासून सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.
पश्चिम बंगालच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहत असल्याचे कारण सांगून ना. गडकरींनी सातारा जिल्हा दौर्याला बगल दिली असली तरी देशाला दिशा देणार्या सातारा जिल्ह्याचे सुपूत्र असणार्या दिवंगत किसनवीर आबा या हिमालयाएवढ्या उंचीच्या नावाचा पुरस्कार गडकरींना जाहीर झाला, हे खरेतर गडकरींचे भाग्यच म्हणावे लागेल. परंतू, पक्षादेशापुढे कोणाचे, काही चालत नाही. त्याला गडकरी तरी कसे अपवाद? या पुरस्कार वितरण सोहळ्याचे नेत्रदीपक असे नियोजन भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते. मात्र, पुण्यापर्यंत आलेल्या गडकरींच्या हेलिकॉप्टरचे पातेच न फिरल्याने या कार्यक्रमासाठी करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च मात्र पाण्यात गेला आहे.