सातारा : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी साताऱ्यात आगमन झाले. या दौऱ्याच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, दोन्ही गटांमधील एकात्मतेचे दर्शन सर्वांना घडले.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती, मात्र काही काळानंतर ती थांबली होती. असे असतानाच शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना भेटण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी एकत्र आले होते. शरद पवार यांच्यासोबत प्रतिभाताई पवार आणि खा. सुप्रिया सुळे यादेखील साताऱ्यात उपस्थित होत्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, दीपक पवार या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, अजित पवार गटाचे खासदार नितीन पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, प्रभाकर देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. राजकीय व्यासपीठावर गट-तट असले तरी प्रत्यक्षात नेतेमंडळी मनाने आजही एकत्रच असल्याची प्रचिती या भेटीच्या निमित्ताने सातारकरांना आली. या सर्व नेत्यांची उपस्थिती साताऱ्यातील या दौऱ्यात विशेष लक्षवेधी ठरली.