पोवई नाका परिसरात दारूसाठ्यासह इको कार जप्त; किकलीच्या युवकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 May 2026


सातारा: सातारा शहरातील पोवई नाका परिसरात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डीबी) मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत विदेशी मद्याचे २७ बॉक्स आणि मारुती इको कार असा एकूण ४ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप विजय बाबर (वय ३०, सध्या रा. सदर बाजार, सातारा, मूळ रा. किकली, ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला शाहू चौक ते पोवई नाका या मार्गावरून एका संशयित वाहनातून दारूची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने चैतन्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटसमोर सापळा लावून संशयित इको कार (क्रमांक एमएच ११ डीए ३१६०) अडवली.

​या वाहनाची झडती घेतली असता, पोलिसांना त्यामध्ये विविध कंपन्यांच्या व्हिस्की आणि बिअरच्या बाटल्यांचे तब्बल २७ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मद्यसाठा आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित आरोपी प्रताप बाबर याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, सुधीर मोरे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. शहरात अवैधरित्या होणाऱ्या दारू तस्करीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळ्याच्या यात्रेत दोघांवर गोळीबार; मुख्य संशयित पसार, दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात
पुढील बातमी
शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील ऐक्याचे दर्शन

संबंधित बातम्या