सातारा : उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात विनापरवानगी वावरत असल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी फिर्याद दिली असून शुभम दीपक कडव (वय २४, रा. आझादनगर कॉलनी, शाहूपुरी, ता. जि. सातारा) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय दंडाधिकारी, सातारा विभाग यांनी हद्दपार प्रस्ताव क्रमांक हद्दपार/एसआर/०६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अंतर्गत संबंधित युवकास हद्दपार करण्याचा आदेश दिला होता. मात्र या आदेशाचा भंग करून शुभम कडव हा सातारा शहरातील आझादनगर कॉलनी परिसरातील स्वतःच्या राहत्या घरी विनापरवानगी वावरत असताना पोलिसांना आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक रोकडे करीत आहेत.