सातारा : जावली तालुक्यातील करहर येथील महिलेला धक्का देऊन गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेणाऱ्या भाच्याकडून मेढा पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करून पोलिस कोठडीही मिळवण्यात आली असून तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करहर ता. जावली येथील रहिवासी रोहिणी बबन दुधाने या २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास घरातील किचनमध्ये भांडी घासत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांचा भाचा अजिंक्य सुरेश पांचाळ (वय २७, मूळ रा. करहर ता. जावली, हल्ली रा. पाचगणी ता. महाबळेश्वर) याने पाठीमागून येत फिर्यादीस धक्का देऊन दुखापत केली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र व सोन्याचे डोरले जबरदस्तीने ओढून तोडून घेऊन पळ काढला.
या घटनेप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११९ (१) अन्वये ४ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी आरोपीकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार मेढा पोलिसांनी आरोपी अजिंक्य पांचाळ याला गुन्हा दाखल होताच तत्काळ अटक केली. न्यायालयाने आरोपीस ८ मे २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीदरम्यान आरोपीकडे कसून चौकशी करून त्याला विश्वासात घेत तपास करण्यात आला. त्यातून फिर्यादीचे जबरीने हिसकावून नेलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र व सोन्याचे डोरले असा संपूर्ण मुद्देमाल १०० टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास मेढा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. वाय. गंगावणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. वाय. गंगावणे, पोलीस हवालदार अनिल सावंत, विजय माळी, माने, पोलीस नाईक धिरज बेसके तसेच पोलीस कॉन्स्टेबल सनी काळे आणि अनिकेत दीक्षित यांनी पार पाडली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.