सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या कोल्हापूर विभागीय मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.७१ टक्के लागला असून गतवर्षीच्या ९६.७५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा १.०४ टक्क्यांनी घट झाली आहे.
दहावी परिक्षेसाठी जिल्ह्यातून नियमित प्रवर्गातील ३६ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ हजार ४१२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यामधून ३४ हजार ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींचा निकाल ९७.२५ टक्के तर मुलांचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १७ हजार ३१७ मुलींपैकी १६ हजार ८४१ मुली उत्तीर्ण झाल्या, तर १९ हजार ९५ मुलांपैकी १८ हजार ९ मुले उत्तीर्ण झाली आहेत.
दरम्यान, पुनर्प्रविष्ट (रिपीटर) विद्यार्थ्यांचा निकाल मात्र समाधानकारक राहिला नाही. जिल्ह्यातील ७२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातून केवळ २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३८.६३ इतकी राहिली आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून विभागाचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९६.६७ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले असून सातारा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.५६ टक्के लागला.
यंदाच्या परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली होती. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे निकालात काहीशी घट झाल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील ११६परीक्षा केंद्रांपैकी ११५ केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध होती.
दरम्यान, परीक्षोत्तर गैरमार्ग चौकशीत सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली असून संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण व निकाल महामंडळाचे संकेतस्थळ, तसेच निकाल अधिकृत संकेतस्थळ वर पाहता येतील अशी व्यवस्था शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली होती.
कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून विभागाचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९६.६७ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले असून सातारा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.५६ टक्के लागला आहे.