सातारा : सातारा पंचायत समितीची मासिक सभा सातारा तालुक्यातील पायाभूत समस्या आणि सुविधांच्या संदर्भात हेळ सांड होत असल्याच्या तक्रारींनी गाजली. दूषित पाणी आणि दळणवळणाच्या संदर्भातल्या मूलभूत अडचणी या दोन प्रश्नावरून पंचायत समिती सदस्यांनी प्रशासनाला चांगले धारेवर धरले. ही सभा सभापती महेश गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी उपसभापती, गटविकास अधिकारी सुशील संसारे, प्रोफेशनरी बीडीओ अंजली बर्गे तसेच पंचायत समिती सदस्य राहुल कदम, सौ. लोटेकर आदी उपस्थित होते. सभेत वीज, पाणीपुरवठा, रस्ते, शेती नुकसान आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सदस्यांनी जोरदार बाजू मांडत प्रशासनाची कोंडी तर केलीच शिवाय या सुविधा तात्काळ तालुक्यात उपलब्ध व्हाव्यात, अशी जोरदार मागणी केली.
पाटखळ परिसरातील डीपी वारंवार बिघडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. अधिक क्षमतेचा किंवा समांतर डीपी बसवण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तोच डीपी वारंवार दुरुस्त करून तात्पुरती उपाययोजना केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. जैतापूर येथील विजेचा पोल शिफ्टिंगसाठी संबंधितांनी पैसे भरूनही अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. हा पोल सार्वजनिक पाणंद रस्त्यावर असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
आपशिंगे येथे कायमस्वरूपी वायरमन नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. यावर महावितरणकडून “८० टक्के कर्मचारी कंत्राटी आणि २० टक्के कायम कर्मचारी असल्याने मर्यादांमध्ये काम करावे लागत आहे,” असे स्पष्टीकरण देण्यात आले.
एसटी बसच्या पाठीमागे शालेय मुले धावत असल्याच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना समज देण्याची मागणी करण्यात आली. कारी गणातील सदस्य सौ. लोटेकर यांनी परळी परिसरात माकडांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब मांडत वन विभागाने यावर नियोजनबद्ध उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देगाव, वळसे परिसरातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. आठ कामे पूर्ण झाली असून १२ कामे अद्याप अपूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वरणे गणातील रस्त्यांच्या कामांबाबत स्थानिक सदस्यांना माहिती देण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे मान्य केले. त्यानंतर सभापती महेश गाडे यांनी यापुढे प्रत्येक विकासकामाची माहिती संबंधित पंचायत समिती सदस्यांना देण्याचे निर्देश दिले.
बांधकाम विभागाचे अभियंता माधव पाटील यांनी २०२४-२५ मधील कामांचा आढावा मांडण्यास सुरुवात केली असता सदस्यांनी “जुना आढावा नको, नवीन कामांचे नियोजन सांगा,” अशी भूमिका घेत नवीन प्रस्ताव कधीपर्यंत सादर करावेत, याबाबत विचारणा केली. कोडोली जिल्हा परिषद शाळेसाठी तीन महिन्यांपूर्वी निविदा मागवूनही पुढील कार्यवाहीबाबत माहिती नसल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. स्थानिक सदस्यांना विश्वासात न घेता विकासकामे केली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.
पाणीपुरवठा विभागाने सायली गावातील पाणी शुद्धीकरणाबाबत माहिती देताना टीसीएल टाकण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, अरगडवाडी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचे सदस्यांनी सांगितले. निनाम गावात दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी “कठडा तुटल्याने समस्या निर्माण झाली असून तो दुरुस्त करावा लागेल,” असे उत्तर दिले.
सभेच्या प्रारंभी प्रोफेशनरी बीडीओ अंजली बर्गे यांनी स्वतःचा परिचय करून दिला. पंचायत समिती सभेत विविध स्थानिक प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारत नागरिकांच्या अडचणी मांडल्याने सभा चांगलीच गाजली.