नाशिक: नाशिक शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित महिला आरोपी निदा खान हिच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या २५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातील कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला ताब्यात घेतले असून, अटकेनंतरचा तिचा पहिला फोटो आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्चपासून फरार असलेली निदा खान पोलिसांपासून वाचण्यासाठी वारंवार आपले लोकेशन बदलत होती. ती छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या चार नातेवाईकांसह एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. पोलिसांना तिच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळत होती, मात्र प्रत्येक वेळी ती निसटून जाण्यात यशस्वी ठरत होती. अखेर रात्री ११.३० च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून तिला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, ट्रान्झिट वॉरंट प्रक्रियेनंतर तिला संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. आता तिला नाशिकला आणले जात असून येथील न्यायालयात तिची पुढील सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास यंत्रणांनी न्यायालयात निदा खानच्या जामिनाला जोरदार विरोध दर्शवला होता. २ मे २०२६ रोजी नाशिक न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता, त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली होती. एसआयटीचे तपास अधिकारी संदीप मिटके यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, संशयित आरोपीने पीडितेला विशिष्ट धार्मिक प्रथांकडे वळवण्याचा प्रयत्न केला, धार्मिक ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि विविध संशयास्पद लिंक्स पाठवल्या होत्या. या प्रकरणाचे धागेदोरे मालेगावसह मलेशियापर्यंत जोडले गेल्याचा प्राथमिक संशय असून, त्या दृष्टीने डिजिटल रेकॉर्ड आणि परदेशी संबंधांचा सखोल तपास सुरू आहे.
निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणातील अनेक मोठी रहस्ये उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला फरार राहण्यासाठी कोणी मदत केली, यामागे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता नाशिक पोलीस घेत आहेत. या अटकेनंतर नाशिक आणि संभाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.