पुणे : राज्यात पुढच्या आठवड्यात १४ मे ते २० मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पावसाळ्यासारखा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबराव डख यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे तर हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.
सिंधूदुर्ग जिल्ह्यात उष्ण-दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा आणि गारपीटीसह पावसाचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
आंबा हंगाम मध्यावर असताना सिंधुदुर्गावर वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत (ता. ८) पावसाचा अंदाज दिल्याने आंबा बागायतदारांची धास्ती वाढली आहे. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजकांची देखील चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांसाठी हे वर्ष अतिशय निराशाजनक राहिले आहे. मोहर करपल्यामुळे अगोदरच आंबा, काजूचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आले आहे. त्यातच ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकात फळगळ आणि आंबा करपण्याचे प्रमाण वाढले. या सर्व संकटांतून मार्गक्रमण करीत असताना आता उरल्यासुरल्या पिकांसमोर वादळी वाऱ्यांचे संकट उभे राहिले आहे.
हवामान विभागाने आजपासून ८ मे या कालावधीत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे. वारे प्रतिताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणार असल्याचा अंदाज असल्याने आंबा बागायतदारांची धास्ती अधिकच वाढली आहे. किरकोळ प्रमाणात आंबा परिपक्व झाला आहे. त्यामुळे पूर्वमोसमी पाऊस आणि वादळी वारे झाल्यास या भागातील आंबा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.