महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश; मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, आधुनिक सुविधा साठी शासनाचे ठोस पाऊल

by Team Satara Today | published on : 07 May 2026


मुंबई  :  महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे पार पडला. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड,  पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार उपस्थित होते. 

 या बैठकीत इंडियन 'रेड क्रॉस सोसायटी' संचलित महाबळेश्वर येथील 'बेल एअर हॉस्पिटल' च्या कामकाजाचा आढावा घेतला. या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या रुग्णालयात आयसीयू (५ खाटा), डायलेसिस (३ खाटा)  सुविधा देण्याच्या व अतिरिक्त पदांनाही मान्यता देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

बैठकीत वाई तालुक्यातील उडतारे व बोपर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच खंडाळा  तालुक्यातील भादे व महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले असून, उर्वरित कामांना गती देण्याचे  तसेच आवश्यक पदनिर्मितीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश मा.आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.श्री. प्रकाश आबिटकर यांनी, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घ्यावेत असे निर्देश दिले  रिक्त पदे भरून मनुष्यबळाची कमतरता दूर करणे आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणेत यावे.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले,“माझ्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नवीन इमारती, उपकरणे आणि मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात जाण्याची गरज कमी होईल. या सर्व कामांना गती देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्यात येईल.”

या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला  बळकटी मिळणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरासह विविध ठिकाणी होणार महाराजस्व समाधान शिबिर; जिल्हाधिकारी संतोष पाटील; वाईत अप्पर मुख्य सचिव विकास खारगे राहणार उपस्थित
पुढील बातमी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यांच्या तडाख्यात; पायलटचे कौशल्य ठरले जीवदान

संबंधित बातम्या