सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप उमेदवारांना मतदान केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आलेल्या प्रकरणात गुरुवारी झालेल्या सुनावणीत महत्त्वाची घडामोड घडली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तक्रारदार पक्षाला इंग्रजीतील अपात्रता अर्जाचा मराठी अनुवाद करून संबंधित सदस्यांना देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील सुनावणी १९ मे रोजी होणार असून त्यावेळी संबंधित सदस्य आपली बाजू मांडणार आहेत.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक २० मार्च रोजी पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सदस्य कामेश कांबळे, लता कर्णे आणि ऋतुजा जगताप यांनी भाजप उमेदवारांना मतदान केल्याने जिल्हा परिषदेत सत्तासमीकरण बदलले आणि भाजपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले.
या मतदानानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान गटनेते उदय कबुले यांनी संबंधित तिन्ही सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली होती.
या प्रकरणातील पहिली सुनावणी २२ एप्रिल रोजी झाली होती. त्यानंतर २९ एप्रिलला झालेल्या सुनावणीत संबंधित सदस्यांच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली होती. तसेच तक्रार अर्ज इंग्रजी भाषेत असल्याने त्याचा मराठी अनुवाद उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीत तक्रारदार पक्षाचे वकील ॲड. दत्तात्रय घोडके यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित सदस्यांना त्यांच्या भाषेत तक्रारीची प्रत देण्याचे निर्देश दिले.
यावर तक्रारदार पक्षाकडून पुढील चार दिवसांत मराठी अनुवाद उपलब्ध करून दिला जाईल, असे न्यायालयास सांगण्यात आले. त्यामुळे आता १९ मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत राष्ट्रवादीच्या तिन्ही सदस्यांकडून अधिकृत म्हणणे सादर केले जाणार आहे.