कराड : आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथील एका दारू दुकानासमोर शंभर रूपये न दिल्याने चिडलेल्या अनोळखी व्यक्तीने मजुरास चाकूने भोसकले. संतोष पोपट सूर्यवंशी (रा. मलकापूर) असे जखमीचे नाव असून कराड शहर पोलीस ठाण्यात अनोळखी संशयिताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
संतोष सूर्यवंशी हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते दारू पिण्यासाठी आगाशिवनगरमधील एका देशी दारू दुकानात गेले होते. दुकानाबाहेरच एका व्यक्तीने सूर्यवंशी यांच्याकडे दारू पिण्यासाठी 100 रूपयांची मागणी केली. आपल्याकडे 100 रूपये आहेत मात्र आपण 50 रूपयांची दारू पिणार असून उर्वरित पैशातून मुलांना खाऊ घेणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितलं. सूर्यवंशी यांनी दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या संशयिताने अचानकपणे चाकूने भोसकल्याने सूर्यवंशी यांच्या पोटातील आतडी बाहेर आली. अशा जखमी अवस्थेत सूर्यवंशी घरी गेले आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली आहे