सातारा : कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावच्या गायरान जमिनीवर प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेत प्रशासनालाच थेट इशारा दिला. आमच्या गावच्या गायरानातील एक इंचही जागा देणार नाही, गायरान जमिनीवर डोळा ठेवाल तर याद राखाल अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पिटाळून लावत संतापाचा उद्रेक केला.
कोरेगाव नगरपंचायतीने कुमठे येथील गायरान क्षेत्रावर कचरा डेपो उभारण्यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने संबंधित जागेची मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ही बाब समजताच कुमठे ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात तातडीची विशेष ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत प्रकल्पाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला.
ग्रामसभा संपल्यानंतर पदाधिकारी व नागरिकांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन निवेदन दिले. अधिकाऱ्यांनी मोजणी होणार नसल्याचे सांगितले असतानाच दुसरीकडे परीक्षण भूमापक विजय भुजबळ व कर्मचारी गायरान क्षेत्रात दाखल झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्याचवेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद निवसे, पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे व शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.
ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गायरानकडे धाव घेतली. ज्येष्ठ नेते पोपटराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, सुरेश जगदाळे, वैभव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त जमावाने प्रथम नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना आमच्या गायरानाशी तुमचा काही संबंध नाही, असे सांगत तिथून हाकलून दिले.
यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील ग्रामस्थांनी रोखले. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही. आमच्या गावची एक इंच जमीनही देणार नाही, असा इशारा देत त्यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत सुनावले. येथून त्वरित निघून जा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा थेट इशाराही देण्यात आला.
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. चर्चेद्वारे तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली. अखेर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक देवकर व परीक्षण भूमापक विजय भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.
कुमठे ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, पोपटराव जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, सुरेश जगदाळे व वैभव जगदाळे यांच्यासह ग्रामस्थांनी एकमुखाने कचरा डेपोला तीव्र विरोध दर्शविला.
ग्रामसभेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि गायरान वाचवाचा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
एकूणच, कुमठे गावात कचरा डेपो प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी पडली असून ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे.