मुंबई : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना शिक्षण, नोकरी व इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर अभ्यास गट नेमण्याचे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.माजी सैनिक, शहीद कुटुंबीय तसेच अपघातग्रस्त सैनिकांच्या विविध मागण्यांबाबत आज मेघदूत शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस महाएल्गार सैनिक एकतेचा आवाज माजी सैनिक सर्व संघटनीय सैनिक परिवार महाराष्ट्रचे कॅप्टन दाभाडे व पदाधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे गणेश पवार, माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक ओमकार कापले तसेच संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण, नोकरी व विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अर्हता प्राप्त पाल्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तात्काळ निकाली काढण्यासाठी शासन संवेदनशील व सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान, हक्क आणि सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.