फलटण शहरात ८ मे रोजी 'महाराजस्व समाधान शिबिरा'चे आयोजन; प्रशासनाचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

by Team Satara Today | published on : 06 May 2026


फलटण : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार, फलटण शहरात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १' राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत येत्या ८ मे २०२६ रोजी फलटण महसूल मंडळासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारील नगरपरिषद सभागृहात पार पडणार आहे.  

​सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभाग व इतर विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे यासाठी राज्य शासनाने हे निर्देश दिले आहेत. या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  

​शिबिरादरम्यान प्रामुख्याने ७/१२ व ८अ वाटप, वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, आणि अपाक नोंदी यांसारख्या कामांसाठी 'जिवंत ७/१२ मोहीम' राबवली जाईल. तसेच सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे अर्ज भरून घेणे, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे वितरित करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप करणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामे त्वरित निकाली काढली जातील. याव्यतिरिक्त ई-मोजणी, प्रॉपर्टी कार्ड वाटप, पी.एम. किसान योजना (ई-केवायसी), आणि अकृषक जमिनीच्या तरतुदींबाबत मार्गदर्शनही याठिकाणी केले जाणार आहे.  

​प्रशासनामार्फत आयोजित या उपक्रमात फलटण शहरातील सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, महिला बचत गटांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीत सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला बेदम मारहाण करत ३ लाखांचा मुद्देमाल लंपास
पुढील बातमी
दुष्काळी कामांच्या अनियमिततेवरून अनिल देसाईंचा प्रशासनावर हल्लाबोल; उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

संबंधित बातम्या