सातारा : इयत्ता आठवीच्या इतिहास अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याच्या एनसीईआरटीच्या निर्णयावरून राज्यभर प्रतिक्रिया उमटत असताना, श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या भेटीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते.
चर्चेदरम्यान मराठा साम्राज्याशी संबंधित नकाशा वगळण्याचे ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष, विविध स्तरांवर झालेल्या सर्वपक्षीय बैठका आणि महाराष्ट्र धर्म मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या भावना याबाबतही माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राच्या इतिहासाशी व स्वाभिमानाशी निगडित या मुद्द्यावर न्याय मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार असल्याची ठाम भूमिका वृषालीराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी समीर जाधवराव, निलेश झोरे, किशोर ढगे, ओंकार ढोंबे, राहुल मोकाशी, विक्रम क्षीरसागर, गणेश चोरगे, विक्रमादित्य साळुंखे, अरबाज शेख तसेच छत्रपती फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.